Ticker

6/recent/ticker-posts

जाती आणि पोटजाती विसरुन बहुजन समाजाने एक व्हावे - इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर*


           मालेगाव (प्रतिनिधी) : गुरु रविदासांनी हे सारे जग "चमार" आहे असे म्हटले आहे. चमडा, मांस आणि रक्त हे घटक सर्व प्राणीमात्रांत आहेत. हा व्यापक विचार गुरु रविदासांनी दिला असल्यामुळे जाती आणि पोटजातीवरुन भेदभाव न करता सर्व समदुःखी बहुजन समाजाने एक व्हावे तरच आपल्या महामानवांचे स्वप्न साकार होऊ शकते असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.
          नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील निसर्ग चौकातील सुवर्णकार मंगल कार्यालयात ६३४ व्या गुरु रविदास जयंती महोत्सवात प्रमुख व्याख्याते म्हणून साहित्यिक व विचारवंत इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष किरण राजवंशी हे होते.
         आपल्या दिड तासाच्या भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, बहुजन समाज हजारो जातीत विखुरला आहे, प्रत्येक जात आपली एक वेगळी अस्मिता तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. गुरु रविदासांनी जाती व्यवस्थेवर आघात करुन माणसे जोडण्याचा संदेश दिला. मान्यवर कांशीराम साहेबांनी सहा हजार जाती जोडण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे आपणही जाती - पोटजातीत फूट न पाडता सर्व विखुरलेल्या जातींना एक करण्याचा प्रयत्न करावा तरच सम्राट अशोकाच्या काळातील भारत साकार होऊ शकेल
 चर्मकार समाजात जातींच्या आणि पोटजातींच्या संघटना रोज भरपूर निघत आहेत, यामुळे समाज एकसंघ राहू शकणार नाही. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद ही जातीची नाही तर गुरु रविदास आणि सर्व परिवर्तनवादी महामानवांच्या विचारांची संघटना आहे. सामाजिक परिवर्तन हे आमचे ध्येय आहे असे शेवटी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर म्हणाले.
           गुरु रविदास समता सामाजिक विचार मंचच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष देविदास सुरंजे यांनी केले. यावेळी सटाणा येथील डॉ. किरण अहिरे यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिला आणि विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
          अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे राज्य सचिव सुरेश गंगासागरे (जालना), राज्य सहसचिव ऍड. झेड. के. पवार (धुळे), धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र अहिरे, मा. सरपंच बबिता कासवे, समितीच्या सचिव अश्विनी अहिरे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंकुश सुरंजे, सचिन डामरे, दिलीप पाथरे, रोहित तेली, कविता पाथरे, राजेश राजवंशी, सुनिल अहिरे, ज्योती पाथरे, लक्ष्मी सुरंजे, बाळू पवार, गणेश पवार आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments