एकविसाव्या शतकात अंधश्रद्धा निर्मूलन ही सध्या काळाची गरज बनत चालली असून जिकडे पहावे तिकडे तसेच खेड्या पाड्यांमध्ये आजही अंधश्रद्धा मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे, त्यासाठी रात्री-अपरात्री स्मशानात पूजा करणे, लिंबू, नारळ उतरून फेकणे, अंगात भूत शिरल्याचा बहाणा करून भोंदु बाबा आणि मांत्रिकाकडे जाऊन लिंबू, नारळ अंगावरून उतरवून फेकणे, गंडेदोरे करणे अशा प्रकारची अंधश्रद्धा आजही समाजामध्ये बाळगली जात असून त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केल्या जात आहे. यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली व आपल्या प्राणाचे बलिदान दिले.
त्यातच भोकर येथे लोकांच्या मनातून अंधश्रद्धा घालवून टाकण्याचा छोटासा प्रयत्न भोकर न्यूज लाईव्ह चे संपादक श्री रमेश जी. गंगासागरे यांनी काल केला आहे.
घटनेबाबत समजलेली थोडक्यात माहिती अशी की, भोकर बौद्ध स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ऍड. वाघमारे यांच्या संपर्क कार्यालयाच्या समोर परवा रात्री अज्ञात व्यक्तीने नारळ ठेवून त्या नारळाची हळदी-कुंकू आणि पुष्प टाकुन पूजा केलेली दिसून आली. ही बाब एडवोकेट वाघमारे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ते नारळ तसेच ठेवून संपर्क कार्यालयाचे शटर उघडून आतमध्ये प्रवेश केला आणि थोड्याच वेळात त्यांनी ही बाब संपादक रमेश गंगासागरे यांना कळवली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तथा सोशल मीडियावरील प्रसिद्ध बातमीपत्र भोकर न्यूज लाईव्ह चे संपादक गंगासागरे यांनी क्षणाचाही विलंब न करता ते घटनास्थळी धावून आले आणि बघतात तर समोर पूजाअर्चा केलेले नारळ त्यांना दिसून आले. त्यांना ही निव्वळ अंधश्रद्धा असलेली बाब लक्षात आली.
त्यांनी तेथील नारळ उचलले आणि सर्व उपस्थित नागरिका समक्ष त्यांनी नारळ सोलून फोडून खाऊनही टाकले. उपस्थित असंख्य नागरिक हा सर्व प्रकार पाहत होते. गंगासागरे यांना माहीत होते की हा प्रकार दुसरा तिसरा काही नसून हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे, हे नारळ खाल्ल्यावर काहीच होणार नाही, म्हणून त्यांनी सर्वासमक्ष हे नारळ खाऊन अंधश्रद्धेवर मात केली आणि उपस्थितांना याबाबत जागरूक करून अंधश्रद्धां न बाळगण्याचे त्यांनी आवाहन केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात गंगासागरे यांचे स्वागत केले हे विशेष.
0 Comments